भारताने सोमवारी अण्वस्त्रवहनक्षम ‘पृथ्वी २’ या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या घेतली. या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० कि.मी आहे. चंडीपूर येथील चाचणी क्षेत्रातून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. जमिनीवरून-जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून संकुल क्रमांक तीन येथे मोबाईल प्रक्षेपकाच्या मदतीने ही चाचणी सकाळी सव्वानऊच्या सुमारास घेण्यात आली, असे संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले.
‘पृथ्वी २’ क्षेपणास्त्राची चाचणी १०० टक्के यशस्वी झाली असल्याची माहिती एकात्मिक चाचणी क्षेत्राचे संचालक एम. व्ही. के.व्ही प्रसाद यांनी दिली.
उत्पादन साठय़ातून अंदाजे (Random)) निवडलेले हे क्षेपणास्त्र खास तयार करण्यात आलेल्या एसएफसीवर ठेवण्यात आले. त्याचे उड्डाण डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या वैज्ञानिकांनी पाहिले. प्रात्यक्षिक सराव स्वरूपाची ही चाचणी होती. डीआरडीओच्या रडार्सनी या क्षेपणास्त्राच्या मार्गाचा मोगावा घेतला, ओडिशातील दूरवहन केंद्रे व इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीमच्या मदतीने केलेल्या पाहणीनंतर ही चाचणी यशस्वी झाल्याचे जाहीर करण्यात आले. बंगालच्या उपसागरातील जहाजावरील पथकानेही या उड्डाणाचे निरीक्षण केले. भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये २००३ मध्ये पृथ्वी २ हे क्षेपणास्त्र सहभागी करण्यात आले असून ते डीआरडीओच्या एकात्म क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार करण्यात आले आहे. हा सराव चाचणीचा भाग होता व डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी त्याचे निरीक्षण केले असे सूत्रांनी सांगितले.
सामरिक शस्त्रसाठय़ात भारताने पृथ्वी क्षेपणास्त्राच्या माध्यमातून कार्यात्मक सिद्धता दाखवून दिली असून यापूर्वी १२ ऑगस्ट २०१३ रोजी या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली होती.

पृथ्वी २ क्षेपणास्त्र
* वहन क्षमता : ५०० – १००० किलो
* द्रव इंधन
* इंजिनांची संख्या – २
* अंतर्गत दिशादर्शन यंत्रणा