News Flash

भारताचा अंतराळात ‘शक्ती’मार्ग!

‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली.

रशिया, अमेरिका आणि चीनपाठोपाठ उपग्रहनाशक क्षेपणास्त्र चाचणीत यश

नवी दिल्ली : हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा नायनाट करणाऱ्या ‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. ‘मिशन शक्ती’ या खास चाचणी मोहिमेद्वारे अवघ्या तीन मिनिटांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संशोधकांनी हे यश मिळवले, ही शुभवार्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास संदेशाद्वारे देशवासीयांना दिली.

भारतीय अंतराळ संशोधकांनी पृथ्वीलगत असलेल्या ध्रुवीय कक्षेतील आपल्या एका नमुना उपग्रहाचा वेध घेत तो तीन मिनिटांत पाडून टाकला. या शोधाद्वारे आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केलेला नाही, तर केवळ स्वरक्षणार्थ हे पाऊल उचलले आहे, असे मोदी यांनी दूरदर्शनवरील संदेशात सांगितले.

अंतराळातील शत्रुराष्ट्राचा उपग्रह पाडण्याचे तंत्रज्ञान रशियाने मिळवल्याची कुणकुण लागल्यानंतर अमेरिकेने मे १९५८ ते ऑक्टोबर १९५९ या कालावधीत ‘ए-सॅट’ मोहीम राबवली. मात्र अनेक चाचण्या अयशस्वी ठरल्यानंतर १९८०च्या दशकात ही मोहीम अमेरिकेच्या हवाई दलाने रद्द केली. त्यानंतर काही काळाने पुन्हा अमेरिकेने ही मोहीम सुरू केली आणि २० फेब्रुवारी २००८ला अमेरिकेला ‘ए-सॅट’ची यशस्वी चाचणी घेता आली. अमेरिकेने अंतराळातील आपलाच एक नादुरुस्त झालेला उपग्रह  त्यावेळी पाडला होता. मात्र त्याआधीच म्हणजे ११ जानेवारी २००७ रोजी चीनने आपला एक हवामानविषयक उपग्रह ‘ए-सॅट’द्वारे पाडून या मोहिमेत आघाडी घेतली होती. चीनने पाडलेला उपग्रह हा पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेत ८६५ किलोमीटरवर होता, तर भारताने पाडलेला उपग्रह हा ३०० किलोमीटरवर होता. चीनने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी २००५ आणि २००६ मध्येही केली होती. रशियाने मात्र आपल्या ‘ए-सॅट’ क्षेपणास्त्राची पहिली अधिकृत चाचणी १८ नोव्हेंबर २०१५ मध्ये केली. मे २०१६ मध्ये त्यांची दुसरी चाचणीही यशस्वी झाली. आता या श्रेणीत भारताने स्थान मिळवले आहे.

या यशाचे वैशिष्टय़ असे की, संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेले आहे, असेही मोदी यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी दोन वर्षांपूर्वी परवानगी देण्यात आली होती आणि या यशाद्वारे देशाने आत्मसंरक्षणात मोठी आघाडी घेतली आहे, असे ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले. इतक्या कमी वेळेत हे यश मिळवून आमच्या संशोधकांनी आपली क्षमताही सिद्ध केली आहे, असेही रेड्डी यांनी सांगितले.

विलंबाचे गूढ..

सकाळी पावणेबारा ते बारा या वेळात मी एक खास संदेश देणार आहे, असे ट्वीट सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांनी केले. प्रत्यक्षात १२ वाजून काही मिनिटांनी त्यांचा संदेश प्रसारित होऊ लागला. पंतप्रधानांनी निश्चित वेळ देऊनही हा विलंब का झाला, याबाबतचे गूढ कायम होते.

जमिनीवरचे प्रश्न दुर्लक्षित!

पंतप्रधानांना आज दूरचित्रवाहिन्यांचा एक तास मोफत प्रसिद्धीचा मिळाला आणि बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता अशा जमिनीवरच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष अवकाशात वळवता आले, असा टोला समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी लगावला आहे. याच ट्वीटमध्ये त्यांनी डीआरडीओ आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले.

अंतराळातील शस्त्रसज्जतेला भारताचा विरोध कायमच राहील. हे संशोधन हे कोणत्याही देशाविरोधात नाही, तर स्वसंरक्षणार्थ आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

डीआरडीओचे अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!

– राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 1:01 am

Web Title: india tests asat india tests its first anti satellite missile system
Next Stories
1 ‘जैश’बाबत पाकिस्तानची आणखी पुराव्यांची मागणी
2 पाकिस्तानी संसदेत बालविवाह आणि धर्मांतरविरोधी विधेयके
3 काँग्रेसच्या दादा मुंडे यांना बेदम मारहाण
Just Now!
X