भारत, थायलंड आणि म्यानमारने १४०० कि.मी. लांबीचा महामार्ग बांधण्याचे ठरविले असून त्यामुळे भारताचा आशियाच्या आग्नेय भागाशी भूमार्गाने प्रथमच संपर्क जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे तीन देशांमधील व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळणार आहे.

थायलंडमधील भारताचे राजदूत भगवंतसिंग बिश्नोई यांनी सांगितले की, दुसऱ्या जागतिक महायुद्धात सात दशकांपूर्वी बांधलेल्या म्यानमारमधील ७३ पुलांचे भारताकडून होणाऱ्या आर्थिक साहाय्यातून  नूतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरणाचे हे काम १८ महिन्यांत पूर्ण होणार असून हा महामार्ग तीनही देशांमधून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे बिश्नोई म्हणाले.

सदर प्रस्तावित महामार्ग भारताच्या पूर्वेकडील मोरेह येथून सुरू होणार असून ते म्यानमारमधील तामू शहरापर्यंत जाणार आहे. तीन देशांमधील मोटर वाहतुकीबाबतच्या करारावर सध्या चर्चा सुरू आहे. हा महामार्ग थायलंडमधील माएसोत जिल्ह्य़ातील टाकपर्यंत जाणार आहे.

या महामार्गमुळे मालवाहतूक सुलभ होईल आणि ईशान्य भारताच्या विकासालाही मदत होणार आहे. हा तीन देशांचा महामार्ग म्हणजे भारताच्या अ‍ॅक्ट-इस्ट धोरणाचा भाग आहे. म्यानमारचे दावेई बंदर आणि औद्योगिक वसाहत प्रकल्प यांनाही यामुळे मदत होणार आहे. प्रस्तावित बंदर हे चेन्नई बंदर आणि थायलंडच्या लाइम चाबंग बंदराला जोडण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.