पूर्व लडाखमधील चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव अद्याप कमी झालेला नसून चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात तणाव असल्या कारणाने भारत यापुढे चीनपासून नियंत्रण रेषेचं रक्षण करण्यासाठी वेगळी रणनीती आखणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. संरक्षण मंत्रालयाची तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांशी आज बैठक पार पडली. सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील या बैठकीला उपस्थित होते.

बिपीन रावत यांच्यासहित तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची रविवारी भेट घेतली. राजनाथ सिंग सोमवारी रशिया दौऱ्यासाठी जाणार असून त्याआधी ही भेट घेण्यात आली आहे. यावेळी राजनाथ सिंग यांना लडाखमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सर्व प्रमुखांना नियंत्रण रेषेजवळ हवाई तसंच समुद्र मार्गावर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यात सांगण्यात आलं आहे.

चीनने नियंत्रण रेषेवर पुन्हा आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत अशी माहिती बैठकीनंतर सुत्रांकडून मिळाली आहे. पूर्व लडाख किंवा इतर ठिकाणी चीनने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही क्षणी ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.

गलवान खोऱ्यातील सैनिकांचे मृत्यू ही भारत-चीन सीमेवर गेल्या ४५ वर्षांत झालेली पहिलीच घटना आहे. या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांनी १९९३ मध्ये केलेल्या करारानुसार या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा घटनांत अग्निशस्त्रांचा वापर न करण्याचे ठरले आहे. गलवान खोऱ्यातील घटनेमुळे या कराराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये उभय बाजूच्या सैनिकांच्या माघारीच्या प्रक्रियेलाही मोठी खीळ बसली आहे.

याबाबत माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी सांगितलं की, ‘‘जर सैन्यमाघारीची प्रक्रिया जलद गतीने पार पडली नाही, तर गलवानमधील घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. समोरासमोर उभे ठाकलेल्या सैनिकांमध्ये तणाव, संतापाची भावना अधिक असते. एखादी लहानशी घटनाही संघर्षांची ठिणगी टाकण्यासाठी पुरेशी ठरू शकते.’’