जगातील सर्वात मोठी मोहीम, तीन कोटी करोनायोद्धय़ांना प्राधान्य

नवी दिल्ली : देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार असून जगातील या सर्वात मोठय़ा कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसह करोनाविरोधी आघाडीवरील सुमारे तीन कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल.

एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या सद्य:स्थितीचा, तसेच देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर लसीकरण मोहिमेची तारीख निश्चित करण्यात आली. ‘विस्तृत आढावा घेतल्यानंतर, लोहरी, मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू इत्यादी सणांच्या पाश्र्वभूमीवर लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे केंद्र सरकारतर्फे शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर लसीकरणाचा हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचारी यांना लस दिली जाईल. त्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती; तसेच बहुव्याधी असलेल्या ५० वर्षांखालील व्यक्ती यांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. त्यांची एकत्रित संख्या सुमारे २७ कोटी असल्याचेही सरकारी निवेदनात म्हटले आहे.

सुरक्षित आणि परिणामकारक

‘सीरम इन्स्टिटय़ूट’ने तयार केलेली ऑक्सफर्डची ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींना भारताने अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. या दोन्ही लशी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.