चीनच्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग * दोन अब्ज डॉलर्सच्या विमानांची अमेरिकेकडे मागणी
चीनच्या वाढत्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणीच्या उद्देशाने भारताने अमेरिकेकडे १०० ड्रोन विमानांची मागणी केली आहे. या ड्रोन विमानांची किंमत २ अब्ज डॉलर्स असून ही विमाने निर्मनुष्य असतात पण ती टेहळणी करू शकतात. त्यामुळे भारताची लष्करी सज्जता वाढणार आहे. दिल्लीतील उद्योग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत व अमेरिका सरकारमध्ये या ड्रोन विमानांच्या खरेदी करारावर चर्चा चालू आहे. भारताने अत्याधुनिक अशा अ‍ॅव्हेंजर ड्रोन विमानांची मागणी केली आहे. चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोन विमानांची खरेदी केली जात आहे.
भारताने एक्सपी वर्गातील टेहळणी ड्रोन विमाने अंतर्गत सुरक्षा व दहशतवादी कारवाया हाणून पाडण्यासाठी केली आहे. भारताने एकूण १०० ड्रोन विमानांची मागणी केली असून त्यांची किंमत २ अब्ज डॉलर्स आहे. गेल्या काही महिन्यात ड्रोन विमानांच्या खरेदी चर्चेला वेग आला असून अमेरिकेने अजूनही ही विमाने भारताला देण्याचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत, कारण भारताने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेत सहभागी होण्याचा अर्ज प्रलंबित आहे. भारताने इटलीच्या नौसैनिकांना जी वागणूक गोळीबार प्रकरणात दोन मच्छीमार मरण पावल्याच्या प्रकरणानंतर दिली होती त्याचा बदला घेण्यासाठी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेत भारताला प्रवेश देण्यात इटलीने अडथळे आणले आहेत. ड्रोन खरेदीतील अखेरचे अडथळे दूर केले जातील व येत्या काही महिन्यात ड्रोन विमानांचा खरेदी करार मार्गी लागेल, असे भारत व अमेरिका या देशांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सशस्त्र ड्रोन व टेहळणी ड्रोन अशा दोन प्रकारच्या विमानांची खरेदी भारत करणार आहे.
इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट ऑफ जनरल अ‍ॅटॉमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांनी सांगितले की, जनरल अ‍ॅटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम्स इनकॉर्पोरेशनला दूरनियंत्रित विमानाची (आरपीए) किती आवश्यकता आहे याची आम्हाला माहिती आहे. जनरल अ‍ॅटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम्स ही कंपनी दूरसंवेदन ड्रोन विमांनाची निर्मिती करते. अमेरिकेतील निर्यात कायद्यानुसार ही विमाने भारताला निर्यात करताना तेथील सरकारची परवानगी लागणार आहे. या विमानांच्या मदतीने टेहळणी, गुप्तचर व इतर क्षमता वाढणार आहेत. भारतीय सीमांवर इलेक्ट्रो ऑप्टिकल व इन्फ्रारेड तसेच रडार टेहळणीला मदत होणार आहे. आरपीए प्रकारच्या ड्रोन विमानांची आपत्तीच्या स्थितीतही मदत होते. बोईंग कंपनीत असताना लाल यांनी भारताला लष्करी सामग्री विक्रीसाठी अमेरिकी सरकारचे मन वळवून मोठे काम केले होते.