इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही राष्ट्रांच्या युद्धात गाझा शहराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या शहराच्या पुनर्बाधणीसाठी आंतरराष्ट्रीय समूहाने मदत करण्याचे आवाहन ‘पॅलेस्टाइन ऑथॉरिटी’ने कैरो आंतरराष्ट्रीय परिषदेत केले होते. या आवाहनाला भारताने प्रतिसाद दिला असून ४० लाख डॉलरची मदतही गाझाच्या पुनर्बाधणीसाठी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
गाझा शहराच्या पुनर्बाधणीसाठी तब्बल ५४० कोटी डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन या देशांमधील युद्धजन्य तणाव नष्ट करण्यासाठी इजिप्तने प्रयत्न केले असून, दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार घडवून आणला आहे. भारताने या निर्णयाचे स्वागत केले असून इजिप्तने केलेल्या प्रयत्नाचे कौतुकही केले.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव (पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिका) संदीप कुमार हे भारताचे प्रतिनिधी म्हणून कैरो परिषदेत उपस्थित होते. गाझाची पुनर्बाधणी या विषयावरील चर्चेत सहभागी होत त्यांनी भारताकडून ४० लाख डॉलर मदत म्हणून देण्यात येतील, असे सांगितले.