भारत पुढील वर्षी पॅरिस हवामान कराराला मान्यता देणार असल्याचे अमेरिकेने जाहीर करून टाकले असले तरी हा दावा भारताने फेटाळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष बराक ओबामा यांच्या चर्चेनंतर काढण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात असे म्हटले होते की, भारताने पॅरिस हवामान करारावर लवकरात लवकर स्वाक्षरी करण्याचे मान्य केले आहे. त्यावर भारताने असे सांगितले की, भारताने हवामान करारावर स्वाक्षरीसाठी कुठलीही कालमर्यादा मान्य केलेली नाही. भारत हरितगृह वायू कमी करण्यासाठी हवामान करारावर स्वाक्षरी करील. हा करार ५५ टक्के उत्सर्जन असलेल्या किमान ५५ देशांना अनिवार्य आहे. या करारावर भारताने स्वाक्षरी करणे गरेजेचे आहे, कारण पुढील अध्यक्ष जानेवारीत कार्यभार घेण्याच्या आधी त्याची अंमलबजवाणी गरजेची आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारावर फेरवाटाघाटींचे सूतोवाच केले आहे. भारताने याच वर्षी करारावर स्वाक्षरी करायचे ठरवले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले की, हा करार पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, पण त्यात कायदेशीर व नियंत्रणात्मक मुद्दे महत्त्वाचे आहेत.