अमेरिकेच्या संसदेने भारताला नाटो देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक मंजुर केले आहे. त्यामुळे आता संरक्षण क्षेत्राशी निगडीत व्यवहारांमध्ये अमेरिका भारताबरोबर आपले नाटोचे सहकारी देश इस्त्रायल आणि दक्षिण कोरिया यांच्याप्रमाणे व्यवहार करेल. आर्थिक वर्ष 2020 साठी नॅशनल ‘डिफेन्स ऑथरायझेशन अॅक्ट’ला अमेरिकेच्या सिनेटने गेल्या आठवड्यातच मंजुरी दिली होती. त्यानंतर आता या विधेयकातील संशोधनाच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. सिनेटर जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांनी अमेरिकेच्या संसदेत हे विधेयक सादर केले होते. भारताबरोबर परस्पर सहकार्य, दहशतवादाविरोधात लढा, काऊंटर पायरसी आणि समुद्री सुरक्षेवर भारताबरोबर काम करण्याची आवश्यकता असल्याचे यात नमूद करण्यात आले होते.

दरम्यान, हे विधेयक मंजुर झाल्यानंतर हिंदू अमेरिकन फौडेशनने सेनेटर कॉर्निन आणि वॉर्नर यांचे अभिनंदन केले. नाटो देशांच्या यादीत भारताला समावून घेणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. तसेच भारत आणि अमेरिका या देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत ‘हिंदू अमेरिकन फौडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कालरा यांनी व्यक्त केले. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशातीव संबंधांना असलेले महत्त्व समजले हे मोठी बाब असल्याचे मत शेरमॅन यांनी बोलताना व्यक्त केले.

भारत अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील मोठा भागीदार असल्याचे अमेरिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. तसेच भारताला आता नाटो देशाचा दर्जा मिळाल्यामुळे भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशी संरक्षण सामग्री खरेदी करू शकणार आहे.