पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी सातत्याने पाऊल उचलताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पाकिस्तानला इशारा दिला आहे. येत्या काळात पाकिस्तानला जाणारे पाणी भारत रोखू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर सिंधु जल कराराअंतर्गत पाकिस्तानला मिळणारे पाणी रोखावे या मागणीने जोर धरला आहे. व्यास, रावी आणि सतलज नंदीचे पाणी भारतातून पाकिस्तानला जाते.

बागपत येथील एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, पाकिस्तानला दिले जात असलेल्या तीन नद्यांचे पाणी भारत रोखेल. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाण्यासाठी वणवण होईल. तीन नद्यातील पाणी प्रकल्पाद्वारे पाकिस्तान ऐवजी यमुना नदीत सोडले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसने पुलवामा हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचे होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. त्याचवेळी पंतप्रधान नरेद्र मोदी उत्तराखंडच्या जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते, असा आरोप त्यांनी केला आहे.