आगामी वर्षात भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदराच्याबाबतीत (जीडीपी) ब्रिटन आणि फ्रान्स या दोन बड्या देशांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ‘द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (सीईबीआर) यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आगामी वर्षात वीज आणि तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध होऊन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल. याशिवाय, आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवतील. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था वरच्या स्थानावर असेल. या एकूणच परिस्थितीमुळे आगामी १५ वर्षात जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांच्या यादीत आशियाई देशांचे वर्चस्व असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या तात्पुरत्या स्वरुपाचे धक्के बसत आहेत. सध्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास काहीसा मंदावला आहे. मात्र, तरीही २०१८ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे माघारी टाकेल आणि जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे सीईबीआरचे उपाध्यक्ष डग्लस मॅकविल्यम्स यांनी सांगितले.

२०३२ पर्यंत अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. मात्र, अमेरिका आपले दुसरे स्थान अबाधित राखेल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उद्योग धोरणांमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होईल, असे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, परिस्थिती तितकीही गंभीर नाही. तर ब्रेग्झिटच्या धक्क्यातून सावरत असलेली ब्रिटनची अर्थव्यवस्था २०२० पर्यंत पुन्हा फ्रान्सला मागे टाकेल. तर रशियाचे जागतिक बाजारपेठेतील स्थान आणखी घसरेल. खनिज तेलाच्या कमी किंमतीला सरावलेली रशिया उर्जा क्षेत्रावरच मोठ्याप्रमाणावर अवलंबून राहील. मात्र, त्यामुळे नुकसान होऊन रशियाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून १७ व्या स्थानापर्यंत खाली घसरेल, असे अंदाजही सीईबीआरच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.