पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात झालेल्या अनौपचारिक भेटीनंतर ११ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी या सर्व कैद्यांना मुक्त करण्यात येणार आहे. भारताने सद्हेतूने हे पाऊल उचलले असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर या सर्व कैद्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली असल्याने भारत त्यांना मुक्त करत असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या सर्व कैद्यांना वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानला पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजत असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंड सुनावल्यानंतर भारत सरकारने घेतलेला अशाप्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायजेशन (एससीओ) शिखर परिषदेत दोन्ही देशातील पंतप्रधानांची भेट झाली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. मोदींनी शरीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि कुटुंबीयांची चौकशीही केली होती.

भारताने गेल्या आठवड्यात चुकून आंतरराष्ट्रीय सीमा पार करून पंजाबमध्ये आलेल्या दोन मुलांना पाकिस्तानकडे सोपवले होते. अली रेजा (वय ११) आणि बाबर (वय १०) हे दोघे आपले काका मोहम्मद शहजादबरोबर सीमा पार करून भारतात आले होते. भारताने शहजादला अजून आपल्या ताब्यात ठेवले आहे. या दोन्ही मुलांना एप्रिल महिन्यातच मुक्त करण्यात येणार होते. पण पाकिस्तानने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी हा निर्णय पुढे ढकलला होता.