अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडून भारतीयांच्या इंटरनेटवरील माहितीची हेरगिरी करण्याच्या कृतीबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. या हेरगिरीबाबत भारत अमेरिकेकडे विचारणा करणार आहे. अमेरिकेने हेरगिरी करताना नागरिकांच्या खासगी माहिती उघड करून कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर ते योग्य नसेल, असे भारताने स्पष्ट केले.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडून जगभरातील इंटरनेटच्या माहितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. अमेरिकेकडून सर्वात जास्त लक्ष ठेवल्या जाणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे.
अमेरिकेच्या या कृतीबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत असून नागरिकांची खासगी माहिती अधिक सुरक्षित कशी राहील याबाबत चिंता वाटत असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सायबर सुरक्षेच्या दृष्टीने भारत आणि अमेरिकेत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून चर्चा सुरू असते आणि याबाबतीत अमेरिकेशी योग्य ती चर्चा करण्याची गरज असल्याचेही अकबरुद्दीन यांनी सांगितले.
अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या हेरगिरीबाबत भारतीय नागरिकांच्या इंटरनेटवरील खासगी माहिती उघड करून कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर ती चिंताजनक बाब असून असे काही उघडकीस आले तर ते स्वीकारार्ह नसेल, असेही अकबरुद्दिन म्हणाले.
इराण व पाक अग्रभागी
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडून जगभरातील इंटरनेट ग्राहकांच्या माहितीवर लक्ष ठेवले जाते. अमेरिकेकडून अशा प्रकारची हेरगिरी केल्या जाणाऱ्या देशांमध्ये इराणचा प्रथम क्रमांक आहे. त्यापाठोपाठ पाकिस्तान, जॉर्डन, इजिप्त आणि भारत या देशांचा क्रमांक लागतो.