काश्मीर संदर्भात केलेल्या विधानावरुन भारताने टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत तसेच भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करु नका असेही बजावले आहे. एर्दोगान यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरच्या विषयावर पाकिस्तानच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना त्यांनी काश्मीर संदर्भात हे विधान केले. त्याशिवाय फायनान्शिअल टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला साथ देणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात येते. या यादीतून बाहेर पडण्यासाठी सध्या पाकिस्तानची धडपड सुरु आहे.

त्यासाठी पाकिस्तानने हाफीज सईदविरोधात खटला जलदगतीने चालवला. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था अत्यंत खराब स्थितीत आहे. ग्रे लिस्टमधून बाहेर पडल्यास पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावरुन आर्थिक मदत मिळवण्याचाा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यासाठी पाकिस्तानची सर्व धडपड सुरु आहे.

भारताने काय म्हटले?
“जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असून, आमचा अंतर्गत विषय आहे. एर्दोगान यांची काश्मीर संदर्भातील सर्व विधाने आम्ही फेटाळून लावतो. टर्कीच्या नेतृत्वाने आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करु नये. सत्य काय आहे ते नीट समजून घ्यावे व पाकिस्तानातून उत्पन्न होणाऱ्या दहशतवादामुळे भारत व प्रदेशाला धोका आहे” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे. कालच पुलवामा दहशतवादी हल्ल्याची वर्षपुर्ती होत असताना, एर्दोगान यांनी हे विधान केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच भारताचे ४० जवान शहीद झाले होते.