भारतात सोशल मीडियावर करोना संदर्भातील सर्वात जास्त चुकीची माहिती माहिती तयार केली गेली आहे. देशातील इंटरनेट पेनेट्रेशन रेट, युजर्सची इंटरनेट साक्षरतेची कमतरता आणि सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे हे घडल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. ‘१३८ देशांमधील करोनाबद्दल चुकीच्या माहितीची व्यापकता आणि स्त्रोत विश्लेषण’ हा अभ्यास सेजच्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

या अभ्यासात १३८ देशांमध्ये तयार झालेल्या चुकीच्या माहितीच्या ९,६५७ गोष्टींचे विश्लेषण करण्यात आले आणि ९४ संस्थांनी या सर्वांचं फॅक्टचेक केलं. जेणेकरून विविध देशांमध्ये झालेला चुकीच्या माहितीचा प्रसार आणि त्यांचे स्त्रोत काय आहेत, ते समजून घेता येईल. “सर्व देशांपैकी, भारताने (१८.०७ टक्के) सोशल मीडियावर सर्वात जास्त चुकीची माहिती प्रसारित केली. या अभ्यासात भारतापाठोपाठ अनुक्रमे अमेरिका ९.७४ टक्के, ब्राझील ८.५७ टक्के आणि स्पेन ८.०३ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. भारताप्रमाणेच या देशांमध्येही करोनासंदर्भातील सर्वात जास्त चुकीची माहिती तयार  केली गेली.

अभ्यासात निकालांच्या आधारे म्हटलंय की, करोनाबद्दल  चुकीच्या माहितीच्या प्रसाराचा महामारीशी सकारात्मक संबध असू शकतो. “सोशल मीडिया सर्वात जास्त चुकीची माहिती तयार करते. त्याचं प्रमाण सुमारे ८४.९४ टक्के आहे. तसेच करोनासंदर्भातील चुकीच्या माहितीच्या प्रसारासाठी ९०.५ टक्के इंटरनेट जबाबदार आहे. तर फेसबुक सुमारे ६६.८७ टक्के चुकीची माहिती तयार करते,” असंही या अभ्यासात म्हटलंय.

यापूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेने देखील करोना संदर्भातील चुकीची माहिती पसरवून लोकांचे जीव धोक्यात आणले जात असल्याची चेतावणी दिली होती. कोणत्याही विश्वासार्ह स्त्रोतांकडून ऐकलेल्या माहितीची देखील विश्वास ठेवण्यापूर्वी दोनदा पडताळणी करून घ्या, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं होतं.