राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे प्रतिपादन

जागतिक शांतता आणि स्थैर्याला दहशतवादापासून सर्वाधिक धोका असल्याने त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारत आणि ब्रिटनने अधिक सहकार्य करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे भारताच्या दौऱ्यावर आल्या असून सोमवारी सायंकाळी मे यांनी मुखर्जी यांची भेट घेतली. विकास आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारत ब्रिटनकडे महत्त्वाचा सहयोगी म्हणून पाहात आहे, असे या वेळी मुखर्जी म्हणाले.

मेक इन इंडिया, कुशल भारत, डिजिटल इंडिया यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ब्रिटनमधील कंपन्यांना भारत प्रोत्साहन देईल, असे मुखर्जी यांनी म्हटल्याचे राष्ट्रपती भवनातील प्रवक्त्याने सांगितले.

जागतिक शांतता आणि स्थैर्य यांना सर्वाधिक धोका दहशतवादापासून आहे, त्यामुळे भारत आणि ब्रिटनने त्याचा प्रतिकार करण्यासाठी अधिक सहकार्य करणे गरजेचे आहे, दहशतवादाविरोधात लढताना आंतरराष्ट्रीय समुदायाने निर्धार दाखविला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले.

युरोपीय समुदायाबाहेर परस्पर चर्चा करण्यासाठी मे यांनी भारताची निवड केली, त्याबद्दल मुखर्जी यांनी समाधान व्यक्त केले.