जम्मू-काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानच्या परिसराचा पाकव्याप्त काश्मीरमध्ये समावेश करण्याच्या निर्णयावर बुधवारी भारताने तीव्र नाराजी दर्शविली. गिलगिट-बाल्टिस्तानचा पाकमधील पाचवा प्रांत म्हणून समावेश करण्यात आल्याचे पाकिस्तानकडून घोषित करण्यात आले होते. मात्र, भारत स्वत:चा कोणताही प्रदेश सहजासहजी सोडून देईल, हा समज चुकीचा असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत सांगितले. बीजेडीचे खासदार भार्तुहरी महताब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्वराज बोलत होत्या. पाकिस्तानने गिलगिट-बाल्सिटस्तानला पाचवा प्रांत म्हणून घोषित केले, यावर आपल्या सरकारची भूमिका काय आहे?, असा सवाल त्यांनी विचारला. सरकारने इतिहास विसरू नये. त्याची पुनरावृत्ती होणे निषेधार्ह असेल, असे महताब यांनी म्हटले. यावर उत्तर देताना सुषमा स्वराज यांनी भारताने ही बाब निदर्शनास आल्यानंतरच लगेचच पाकिस्तानच्या निर्णयाला विरोध केल्याचे स्पष्ट केले. आम्ही काही प्रदेश असाच सोडून देऊ, अशी शंका आमच्या सरकारच्याबाबतीत उपस्थित करणेही चुकीचे आहे. यावेळी सुषमा स्वराज यांनी गिलगिट-बाल्सिस्तानला पाकचा भाग घोषित करण्याच्या निर्णयावरोधात संसदेने मंजूर केलेल्या ठरावाची आठवण करून दिली. आज आमचे सरकार केंद्रामध्ये सत्तेत आहे. यावेळी सुषमा स्वराज यांनी काश्मीर प्रश्नासाठी आयुष्य वेचलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाचा उल्लेख करताना ”जहां हुए बलिदान मुखर्जी वो काश्मीर हमारा है, जो काश्मीर हमारा है, वह सारा का सारा है”, हा भाजपचा नारा असल्याचे सांगितले.

काही दिवसांपूर्वी गिलगिट आणि बाल्टिस्तानला पाचवा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचा ब्रिटनने निषेध दर्शवला होता. ब्रिटीश संसदेत या संदर्भातील एक प्रस्तावच मंजूर करण्यात आला असून यात गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भाग भारताच्या जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले होते.

सध्या पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि पंजाब असे चार प्रांत आहेत. आता पाकिस्तानने गिलगिट आणि बाल्टिस्तानला पाचवा प्रांत घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान आणि चीनमधील आर्थिक हितसंबंधांच्या दबावातून पाकने हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. पण या निर्णयासाठी पाकला घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. या प्रस्तावामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये कटूता निर्माण होण्याची शक्यता आहे.