भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून ‘चांद्रयान-२’ या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण होईल, या मोहीमेसाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांपेक्षाही हा खर्च कितीतरी पटींनी कमी आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जस्टिस लीग’ या हॉलिवूड चित्रपटाच्या निर्मितीपेक्षाही हा खर्च कमी आहे. या चित्रपटासाठी साधरण ३०० मिलियन युएस डॉलर (१,९३३ कोटी )खर्च आला होता. तर २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘इंटरस्टेलर’ या सायफाय चित्रपटासाठी १,०६२ कोटी रुपये खर्च आला होता. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांपेक्षा ‘चांद्रयान-२’ मोहीमेचा खर्च कैक पटींनी कमी आहे.

भारताची ही दुसरी चांद्रमोहीम असून आजवर फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात ते उतरवण्याचे उद्दिष्ट असल्याचे इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यानचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. एप्रिलमधील प्रक्षेपण यशस्वी झाले नाही तर नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रयत्न केला जाईल, असे सिवन म्हणाले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणे खूप कठीण काम आहे. त्या भागात लाखो वर्षांपूर्वी तयार झालेले खडक आहेत. त्यांच्या नमुन्यांच्या अभ्यासातून विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उकलण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. चांद्रयान-१ ने चंद्रावरील पाण्याचा शोध लावला होता. दुसरी मोहीम त्यापुढील संशोधनाच्या उद्देशाने आखली आहे.
विशेष म्हणजे ‘मंगलयान’ मोहीमदेखील अनेक हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी खर्चात यशस्वी करण्यात आली होती.