दिल्लीतील वायू प्रदूषणाने किती धोकादायक पातळी गाठली आहे, याचा प्रत्यय रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामनादरम्यान आला. आज तिसऱ्या दिवशी उपहारानंतरचा खेळ सुरू झाल्यानंतर श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरू गमागे प्रदूषणामुळे त्रास जाणवू लागला. त्याला गोलंदाजी करताना धाप लागत होती. यादरम्यान श्रीलंकेच्या अनेक खेळाडुंनी तोंडावर मास्क घातले. मात्र, लाहिरू गमागेला सातत्याने त्रास होऊ लागल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल यांने पंचांकडे खेळ थांबवण्याची मागणी केली.

प्रदूषणामुळे दिल्लीत धुरक्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हवेच्या दर्जा घसरण्याबरोबरच प्रकाशही अंधूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात यावा, अशी मागणी श्रीलंकेने पंचांकडे केली. श्रीलंकेचे ११ पैकी आठ खेळाडू तोंडाला मास्क लावून क्षेत्ररक्षण करत होते. त्यामुळे पंचांनी सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याशी चर्चा केली. मात्र, या चर्चेनंतर पंचांनी श्रीलंकेची मागणी फेटाळून लावत पुन्हा खेळाला सुरूवात केली. मात्र, त्यानंतर काही वेळातच लाहिरू गमागेला पुन्हा श्वास घेण्यात त्रास जाणवू लागला. त्यामुळे लाहिरूने डॉक्टरांच्या सल्ल्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खेळाला पुन्हा सुरूवात झाली. मात्र, त्यानंतरही श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल सातत्याने पंचांकडे सामना थांबवण्याची मागणी करत राहिला. यादरम्यान श्रीलंकन संघाच्या व्यवस्थापकांनीही मैदानावर येऊन पंचांशी चर्चा केली. त्यामुळे खेळात सातत्याने व्यत्यय येत होता. अखेर भारताचा कर्णधार विराट कोहली याने ड्रेसिंग रूममधून डाव घोषित केल्याचे जाहीर केले. यावेळी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर काहीसे रागीट हावभाव होते. मैदानावर असलेल्या वृद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजाच्या दिशेने हातवारे करून विराट ‘आता आपण गोलंदाजी करून दाखवुया’, असे सांगू पाहत होता.

दरम्यान, श्रीलंकन संघाची मागणी योग्य होती किंवा नव्हती यावरून सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. भारतीय खेळाडू मास्क न घालता फलंदाजी करू शकतात तर श्रीलंकन खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण का करू शकत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, यानिमित्ताने दिल्लीतील वायू प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.