कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मंड्या मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी त्यांचे वडील जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले आहे. देवेगौडा पंतप्रधान झाल्याने पुन्हा एकदा कन्नड व्यक्ती पंतप्रधान होईल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर अभिनयातून राजकारणात आलेले एमएच अंबरिश यांची पत्नी सुमलता यांना मंड्या मतदारसंघातून उभे केले जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

कुमारस्वामी म्हणाले, संपूर्ण देशातील वातावरण वडिलांसाठी अनुकूल आहे. सर्वांना ते पंतप्रधान व्हावेत असे वाटते. जर लोकांनी काँग्रेस आणि जेडीएस आघाडीला पाठिंबा दिला तर कर्नाटकमधील २८ पैकी २० ते २२ जागांवर आपल्याला विजय मिळाला तर वडिलांचे पंतप्रधान होणे निश्चित आहे. आजची राजकीय स्थिती तशीच आहे, जशी १९९६ मध्ये होती. पुन्हा एकदा एका कन्नड व्यक्तीला पंतप्रधानपद मिळेल, असेही त्यांनी म्हटले.

मंड्या येथे ५ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी ते आले होते. हा उद्घाटन कार्यक्रम कुमारस्वामी यांचा मुलगा निखिलच्या राजकीय पदार्पणाचा कार्यक्रमही ठरला. जेडीएस नेत्यांनी छोट्या कुमारस्वामींना मत द्या, असे आवाहन यावेळी लोकांना केले. जेडीएसचे मंड्या येथील खासदार एलआर शिवराम गौडा यांनी जर आगामी निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरी आपण निराश होणार नसल्याचे म्हटले. निखिल यांच्या विजयासाठी आपण मेहनत घेऊ असे ते म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरु असलेल्या तणावाबाबत कुमारस्वामी म्हणाले की, जर आपले वडील देवेगौडा हे पंतप्रधान असते तर अशा पद्धतीच्या दहशतवादी घटना घडल्या नसत्या. सीमेवर शांतता राहिली असती.