सिक्कीममध्ये भारताची घुसखोरी ही फक्त अमेरिकेला खुश करण्यासाठी असल्याचे चीनमधल्या ग्लोबल टाईम्स या सरकारी मुखपत्र असलेल्या वृत्तपत्राने म्हटले आहे. ग्लोबल टाईम्समध्ये आलेल्या लेखात चीनने भारताची सीमारेषेवर सैन्य आणण्याची भूमिका ही फक्त डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी आहे, आम्ही चीनला कशी टक्कर देऊ शकतो हे दाखवण्यासाठी आहे असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे. चीनची प्रगती रोखण्यासाठी भारत कसा प्रयत्न करतो आहे हे अमेरिकेला दाखवण्यासाठी भारताकडून या कारवाया सुरू झाल्या आहेत,असा आऱोप या लेखात करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांची भेट गेल्याच आठवड्यात झाली, या भेटीदरम्यान भारताने अमेरिकेसोबत शस्त्र खरेदी आणि विमान खरेदीचा करार केला. या कराराचा फायदा अमेरिकेला फारसा होणार नाहीये, मात्र या करारामुळे भारताची प्रशांत महासागरावरची पकड मजबुत होईल आणि भारतीय नौदलाला चीनवर नजर ठेवणे सोपे जाणार आहे, असेही चीनमधल्या ग्लोबल टाईम्सच्या लेखात नमूद करण्यात आले आहे. तसेच चीनची प्रगती रोखण्यासाठी आम्ही कसे प्रयत्नशील आहोत, चीनच्या वन बेल्ट वन रोडला आम्ही कसा विरोध करतो आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी सिक्कीममध्ये घुसखोरी केली आहे, असेही चीनमधले वरिष्ठ जाणकार लियू ज्येंगी यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्यात आता सीमावाद रंगताना दिसतो आहे, भारतीय सैन्यदलाने काही दिवसांपूर्वीच चीनची सीमारेषा ओलांडून घुसखोरी केली, कारण त्यामागे अमेरिकेने भारताला मदत करावी असा हेतू होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातले संबंध सामंजस्याचे दिसून आले, म्हणूनच या दोघांनी आपल्या भाषणांमध्ये दोन्ही देशांवर कौतुकाचा वर्षाव केला. चीनचा प्रभाव जगभरात वाढतो आहे, अमेरिकेला हे नको आहे, म्हणूनच ते भारताला पाठिंबा देऊन चीनला तोंडघशी पाडू शकतात असे त्यांना वाटते आहे.

चीनचा विरोध करण्यासाठी भारत अमेरिकेची साथ देतो आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीने नरेंद मोदी यांना त्यांचे अनेक हेतू साध्य करायचे आहेत,अशी टीका चीनने ग्लोबल टाईम्सच्या लेखात केली आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली होती. या भेटीची चर्चा जगभरात रंगली होती. भारतच आपला सच्चा दोस्त असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. त्याचमुळे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारत आणि अमेरिका या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली होती. आता चीनला मात्र भारत आणि अमेरिकेची मैत्री डोळ्यात खुपते आहे हेच या बातमीवरून स्पष्ट होते आहे.