पाकिस्तानच्या उलटय़ा बोंबा
सीमेवरील तणाव आणि दोन भारतीय सैनिकांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर भारत शाब्दिक युद्धखोरीत गुंतला असला तरी उपखंडाला युद्ध परवडणारे नसल्याने आम्ही त्या शाब्दिक युद्धात ओढले न जाता संयमाने पावले टाकू, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी मंगळवारी येथे ‘एशिया सोसायटी’च्या कार्यक्रमात सांगितले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावल्याच्या पाश्र्वभूमीवर त्या प्रतिक्रिया देत होत्या.
भारत सरकार आणि तेथील काही नेते यांची चिथावणीखोर वक्तव्ये एकून आम्ही कमालीचे निराश झालो आहोत. पण तरीही संयम न सोडण्याचा कित्ता आम्ही घालून देत आहोत, असेही खार यांनी संभावितपणे सांगितले. भारत, पाकिस्तान किंवा दक्षिण आशियाला दोन देशांतले युद्ध परवडणारे नसल्याने चर्चेचा मार्ग खुला राहिलाच पाहिजे, यावर आमचा भर आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यानंतर अशी युद्धखोरीची भाषा सुरू झाली आहे की गेल्या साठ वर्षांतील तणावाच्या आठवणी पुन्हा आमच्या मनात ताज्या झाल्या आहेत. त्या आठवणींना प्रयत्नपूर्वक दूर करून आम्ही चर्चा व सामोपचारासाठी प्रयत्न सुरू केले होते, असेही खार म्हणाल्या. आज भारतात आमच्यावर जहरी टीका करण्यासाठी चढाओढच सुरू आहे. आमच्या जागी पूर्वीच्या धाटणीचे सरकार असते तर भारताला जशास तसे उत्तर देण्यात आम्हीही कमी पडलो नसतो. पण आम्ही विचारपूर्वक गप्प आहोत.
आपल्या दोन जवानांचा शिरच्छेद झाल्याचा भारताचा आरोप खार यांनी फेटाळला. कोणाही भारतीय सैनिकाच्या शिरच्छेदाला आमचा कदापि पाठिंबा असूच शकत नाही. तरीही भारताच्या आरोपानंतर आम्ही व्यापक तपास केला आणि त्या आरोपात तथ्य आढळले नाही, असाही दावा त्यांनी केला. भारताच्या लष्करी प्रवक्त्यानेही हेमराज याचा शिरच्छेद झाल्याचा इन्कार केला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आमच्याही बाजूचे दोन सैनिक ठार झाले आहेत. त्यांचेही दोन सैनिक ठार झाल्याचे ते सांगतात. तेव्हा चर्चेने यातील वाद सोडवता येऊ शकतो. आम्ही दोघांनी प्रत्येक पातळीवर संवाद साधून परिपक्वतेचा प्रत्यय दिला पाहिजे, असेही खार म्हणाल्या. माझ्या सरकारने भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी गेली चार वर्षे अथक प्रयत्न केला आहे. त्यासाठी आम्ही अशीही पावले उचलली जी उचलण्याचे धाडस याआधीच्या कोणत्याही सरकारने दाखविले नव्हते. युद्ध आणि तणावाने काहीही भले होत नाही, हा धडा गेल्या साठ वर्षांत आम्ही दोघेही शिकलो आहोत. तीन युद्धांनंतरही आमच्यातला तणाव संपला नाही याचा अर्थ युद्ध हा उपाय नाही, हे आम्ही तरी स्वीकारले आहे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.