काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचला आहे. त्यादृष्टीने पाकिस्तानने तयारी करुन ठेवली आहे. काही महिन्यांपूर्वी भारताने हवाई हल्ल्यात उद्धवस्त केलेला बालाकोटचा दहशतवादी तळ पाकिस्तानने नुकताच सुरु केला आहे.

जवळपासून ५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मागच्या तीन वर्षांच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. भारतीय लष्कर सुद्धा पाकिस्तानच्या नापाक हरकतीला जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पाकिस्तानने केलेली छोटीशी चूकही त्यांना महाग पडू शकते. पाकिस्तानल्या कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही पातळीपर्यंत उत्तर देण्याची तयारी लष्कराने केली आहे.

एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. उत्सावाच्या काळात दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. त्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांची तयारी सुरु आहे. मागच्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी सर्वात जास्त धोका आहे. आज सकाळीच लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानने बालाकोटमध्ये दहशतवादी तळ सुरु केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पुन्हा स्ट्राइक करणार का? या प्रश्नावर बिपीन रावत यांनी  आम्ही पुन्हा तशीच कारवाई का करु? त्याच्यापुढे का जाऊ नये? आम्ही काय करु शकतो यावर त्यांनाच विचार करुं दे असे उत्तर दिले.

अप्रत्यक्षपणे त्यांनी बालाकोटच्या पुढे जाऊन कारवाई करण्याचे संकेत दिले. पाकिस्तानला कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही स्तरापर्यंत उत्तर देण्याची तयारी असून त्यासाठी लष्कराने रणनिती बनवली आहे. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरुन मागच्या दोन महिन्यात ६० दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचा अंदाज आहे. दहशतवाद्यांना घुसखोरीला मदत करण्यासाठी चार ते पाच लाँच पॅड तयार आहेत. भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सच्या मिराज-२००० फायटर विमानांनी बालकोटच्या तळावर इस्रायली बनावटीच्या स्पाइस बॉम्बने हल्ला केला होता. भारताच्या हवाई हल्ल्यात काही नुकसान झाले नाही हे पाकिस्तानने दाखवण्याचा खोटा प्रयत्न केला. प्रत्यक्षात भारताने ज्या ठिकाणी कारवाई केली तिथे प्रसारमाध्यमांना ते दोन महिन्यांनंतर घेऊन गेले.