पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सुखरुप सोडवण्यासाठी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या पायलटला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सुत्रांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेकडे भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने तातडीने भारतामध्ये पाठवावे. अभिनंदन प्रकरणावरुन कोणतीही देवाणघेवाण केली जाणार नाही. या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होईल आणि चर्चेचा पत्ता आपल्या हातात आहे असं पाकिस्तानला वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे. अभिनंदन यांना पाकिस्तानकडून चांगली वागणूक दिली जावी अशी भारताची अपेक्षा असल्याची माहिती सुत्रांनी ‘एएनआयला’ दिली आहे.

अभिनंदन प्रकरणावरुन पाकिस्तान पुढे कोणत्याही पद्धतीने नमतं घेण्याची भारताची तयारी नसल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तान सध्या कंधारप्रकरणाप्रमाणे भारतावर दबाव बनवण्याच्या विचारत आहे. असं असलं तरी भारत विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या सुटकेप्रकरणी कोणतीही चर्चा करण्यास तयार नसून त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी हीच भारताची भूमिका असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन वर्थमान यांच्यासोबत पाकने वाईट व्यवहार केल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.