भारत आता लवकरच 5G नेटवर्क सुविधेचा लाभ घेणार आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या संप्रेषण मंत्रालयाने आता भारतात 5G नेटवर्कच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. या चाचण्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल तसंच व्हिआय(VI) या कंपन्या सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. ह्या चाचण्या कधीपर्यंत चालतील याबद्दल मात्र अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. या चाचण्यांसाठी कोणत्याही चायनिज कंपन्यांना परवानगी नसल्याचं अधिकाऱ्यांनी सीएनबीसी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारतातल्या 5G सेवेसंदर्भात हालचाली सुरु होत्या. मात्र, 5G चाचण्या घेण्यासंदर्भातल्या परवानगीची प्रतिक्षा कंपन्यांना लागून राहिली होती. रिलायन्स जिओने यापूर्वीच आपण स्वदेशी 5G नेटवर्क उभारणार असल्याबद्दल पुष्टी केली होती. स्वतःची 5G उपकरणं बनवण्यावरही काम सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संपूर्णपणे भारतात विकसित झालेलं जिओचं 5G नेटवर्क हा मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणांचा एक भाग आहे.
भारतातलं 5G नेटवर्क हे १८००, २१००, २३००, ८००, ९०० मेगाहर्ट्झ वारंवारितेच्या पट्ट्यांवर काम करणार आहे. मात्र हे वारंवारितेचे पट्टे सर्विस प्रोव्हाइडरनुसार बदलू शकतात.

सध्या ३४ देशांमधील ३७८शहरांमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध आहे. दक्षिण कोरियातील ८५शहरं, चीनमधील ५७ शहरं, अमेरिकेतील ५० तर ब्रिटनमधल्या ३१ हून अधिक शहरांचा यात समावेश आहे.