इराणकडून भारताने इंधन खरेदी करू नये यासाठी अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. अण्वस्त्र कराराचे कारण पुढे करत इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. परंतु, इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी मात्र निर्बंध असूनही भारत इंधन खरेदी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच दोन्ही देशातील आर्थिक सहकार्याचे धोरण यापुढेही सुरुच राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबरील बैठकीनंतर माध्यमांसमोर त्यांनी हे वक्तव्य केले.

दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूयॉर्क येथील संयुकत राष्ट्रांच्या आमसभेवेळी भेट घेतली. इराणवरील निर्बंध ४ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे मध्ये इराण आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र करारातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इराणवर नव्याने निर्बंध घालण्याची घोषणा करण्यात आली. अमेरिकेने इराणकडून तेल आयात करणाऱ्यांना देशात तेल खरेदी करण्यास मनाई केली आहे.

आर्थिक सहकार्य आणि कच्च्या तेलाच्या आयातीबाबत आमचे भारताबरोबरचे धोरण स्पष्ट राहिले आहे. मी हीच भावना स्वराज यांच्यासमोर व्यक्त केली आहे. भारताचे आणि आमचे व्यापक संबंध आहेत. यामध्ये ऊर्जा सहकार्याचाही समावेश आहे. इराणला भारताशी द्विपक्षीय संबंध वाढवायचे आहेत, असेही ते म्हणाले.

भारत इराणचा सर्वांत मोठा इंधन ग्राहक देश आहे. भारताने याचवर्षी इराणकडून तेल आयात वाढवण्याचा निर्णय घेतला होता. इराणननेही भारताला यासंबंधीच्या आर्थिक व्यवहारात मोठी सूट देण्याची सुविधा दिली होती. इराणबरोबर व्यापारी संबंध कायम ठेवणाऱ्या मूठभर देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

दरम्यान, भारताने इराणकडून तेल आयात कमी केली आहे. परंतु, इराणकडून तेल आयात बंद करण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही.