अमेरिरकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, त्यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. ­­यावेळी पॉम्पियो यांनी ट्रेड वॉर आणि एस-400 वरही भाष्य केले. आम्हाला जोडीदार मिळाले नाहीत आणि आम्ही एकत्र काम केले नाही असे कधीही झाले नाही. देशांना स्वत:ची सुरक्षा करता यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि भारतानेही असेच प्रयत्न करावेत, अशी आमची अपेक्षा असल्याचे मत पॉम्पिओ यांनी व्यक्त केले. तसेच या दोन्ही मुद्द्यांना संधीच्या रूपात आम्ही पाहतो. तसेच आम्ही एकत्र काम करून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत आणि अमेरिका एकमेकांकडे केवळ द्विपक्षीय संबंधांच्या रूपात पाहत नाही. तर सर्वत्र एकमेकांची मदत करण्याच्या दृष्टीने पाहतात, असेही पॉम्पियो यांनी नमूद केले. यावेळी एस. जयशंकर CAATSA या मुद्द्यावरदेखील भाष्य केले. आमचे अनेक देशांबरोबर उत्तम संबंध आहेत. प्रत्येक देशाचे आपले विचार आहेत. तसेच त्यांचा इतिहासही आहे. तसेच एस 400 व्यवहारावर बोलताना आम्ही राष्ट्राच्या हितासाठी जे योग्य आहे, तेच करणार असल्याचे खडेबोल एस. जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले. दरम्यान, अमेरिका आणि इराण विषयावर बोलताना आखाती देशांमधील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले. आम्ही यावेळी प्रादेशिक सुरक्षा, व्यापाराबाबतही चर्चा केली. इराणबाबत भारताचा एक वेगळा दृष्टीकोन असून पॉम्पियो यांनी इराणबाबत असलेल्या चिंता व्यक्त केल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, इराण दहशतवादाला पोसणारा सर्वात मोठा देश आहे आणि भारताला मोठ्या प्रमाणात दहशतवादाचा सामना करावा लागत असल्याचेही पॉम्पियो म्हणाले. अमेरिका आणि भारताची भागीदारी एका नव्या एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. तसेच आम्ही दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यालाही अधिक दृढ केले आहे. याव्यतिरिक्त आम्ही ऊर्जा, अंतराळ आणि अन्य क्षेत्रांमध्येही परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी पॉम्पियो यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीदेखील भेट घेतली.