भारताने कधीही कुणाच्या भूभागावर डोळा ठेवला नाही. मात्र, देशाच्या सार्वभौमत्वाला कुणी आव्हान दिल्यास त्यास दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर देऊ, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारच्या घोषणेच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला. बोस यांच्या निकटच्या सहकाऱ्याने दिलेली आझाद हिंद सेनेची टोपी मोदी यांनी परिधान केली होती. भारत आपल्या लष्करी दलांचा वापर स्वसंरक्षणासाठीच करेल, आक्रमणासाठी नाही, याचा पुनरुच्चार मोदी यांनी या वेळी केला.

‘‘विद्यमान सरकार बोस यांचे स्वप्न पूर्ण करत आहे. आमचे सरकार सैनिकांना चांगले तंत्रज्ञान व आधुनिक शस्त्रे देत आहे. सैनिकांना अधिक चांगल्या सुविधा देऊन त्यांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुभाषचंद्र बोस यांना अपेक्षित असलेल्या लष्कराची बांधणी करण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकली आहेत. आमच्या सरकारने लक्ष्यभेदी हल्ले करून सीमेपलीकडील दहशतवादाला प्रत्युत्तर दिले,’’ असे मोदी म्हणाले.