भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये आधी १० सप्टेंबरला मॉस्कोमध्ये बैठक झाली. त्यानंतर सोमवारी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्समध्ये चर्चा झाली. या दोन्ही बैठकांमधून ठोस काही निष्पन्न झालेलं नाही. पण सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी काही गोष्टी ठरल्या आहेत. या पुढे फॉरवर्ड भागांमध्ये आणखी सैन्य तैनाती करायची नाही, हा त्याचाच एक भाग आहे.

या भागातील तणाव पूर्णपणे निवळला पाहिजे, पण ते चिनी नेतृत्वाच्या राजकीय हेतूवर अवलंबून आहे असे भारतीय सूत्रांनी सांगितले. एप्रिलमध्ये होती तशी ‘जैसे थे’ स्थिती कायम करावी, अशी भारताची भूमिका आहे. पण भारताने आता पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या आहेत तसेच उत्तर किनाऱ्यावरील आपल्या पोझिशनमध्ये सुद्धा बदल केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

लडाखमध्ये चीन अशा पद्धतीने सुरु करु शकतो युद्ध, IAF चा हल्ला ठरेल निर्णायक

भारतीय सैन्य आधी फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचं तसेच दक्षिण किनाऱ्यावरच्या टेकडयांचा सुद्धा ताबा घेतला नव्हता. पण २९-३० ऑगस्टच्या रात्री भारतीय सैन्याने चीनला झटका दिला. भारताने जी चाल केली, त्याचा रणनितीक फायदा झाला असून चीनच्या सैन्य हालचालींवर लक्ष ठेवता येत आहे. आता चिनी सैन्य जो पर्यंत मागे हटत नाही, तो पर्यंत तरी भारतीय लष्कर हे उंचावरील प्रदेश सोडण्यची अजिबात घाई करणार नाही. कमांडर स्तरावरील चर्चा सकारात्मक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. “तणाव कमी करण्याबद्दल ठोस निर्णय होत नाही, तो पर्यंत परिस्थिती स्थिर ठेवण्याचे ठरले आहे. पुढील फेरीच्या चर्चेचा प्रस्ताव देण्यात आला आहे” असे सूत्रांनी सांगितले.