चाबहार बंदराबाबत झालेल्या करारानुसार गुंतवणूक न केल्यास आणि कच्चे तेल आयातीत कपात केल्यास भारताला परिणाम भोगावे लागतील असा इशारा इराणने भारताला दिला आहे. अमेरिकेच्या दबावात येऊन जर भारताने तेल आयात कपात केली तर त्यांना देण्यात आलेला विशेषाधिकाराचा दर्जा काढून घेण्यात येईल अशी थेट धमकीवजा इशारा इराणने दिला आहे. एकीकडे अमेरिकाचा दबाव आणि दुसरीकडे इराणचा इशारा यामुळे भारत कात्रीत सापडल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर केंद्र सरकार कसा तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इराणचे उपराजदूत मसूद रजवानियन रहागी म्हणाले की, जर भारताने इंधन आयात कपात केली आणि ते सौदी अरेबिया, इराक आणि अमेरिकेसह इतर देशांकडे इंधन खरेदीसाठी गेले तर त्यांचा विशेषाधिकाराचा दर्जा संपुष्टात आणण्यात येईल. चाबहार बंदराच्या विस्तारासाठी भारत ठरल्याप्रमाणे गुंतवणूक करण्यात अपयशी ठरला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. यासंबंधी भारताकडून योग्य ते पाऊल उचलले जाईल, अशी आम्हाला आशा आहे. चाबहार बंदरात त्यांचे सहकार्य आणि भागिदारी सामारिक रूपाने अत्यंत महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.

रहागी एका परिषदेत भारताबरोबरील संबंधांबाबत बोलत होते. व्यापारासाठी चाबहार बंदर भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ओमानच्या खाडीत असलेल्या या बंदरामुळे भारत पाकिस्तानला टाळून इराण आणि अफगाणिस्तानशी थेट व्यापार करू शकतो.

इराणकडून इंधन आयातीवरून अमेरिकेने लादलेल्या बंदीबाबत बोलताना ते म्हणाले, इराण हा भारताचा विश्वसनीय भागीदार राहिला आहे. इराणने नेहमी ग्राहकांच्या हिताची काळजी घेत योग्य दरात इंधन पुरवठा केलेला आहे. जर भारत इंधनासाठी सौदी अरेबिया, रशिया, इराक आणि अमेरिकेसारख्या देशांकडे झुकला तर त्यांना डॉलरमध्ये आयात करावी लागेल. याचाच अर्थ भारताच्या चालु खात्याच्या नुकसानीत वाढ होईल. त्याचबरोबर भारताला दिलेले विशेषाधिकाराचे दिलेले लाभही बंद होतील. इराक आणि सौदी अरेबियानंतर इराण भारताचा तिसरा सर्वांत मोठा तेल पुरवठा करणारा देश आहे.

अमेरिकेने भारतासह इतर देशांना ४ नोव्हेंबरपर्यंत इराणकडून तेल आयात बंद करण्यास सांगितले आहे. या देशांनी असे न केल्यास त्यांना प्रतिबंधचा सामना करावा लागेल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर जून महिन्यात भारताने इराणकडून १५.९ टक्के कमी इंधन घेतले आहे. मे महिन्याच्या तुलनेत ते कमी आहे. भारतानंतर चीन हा इराणचा सर्वांत मोठा ग्राहक आहे.