लोकसंख्येच्या बाबतीत येत्या आठ वर्षात म्हणजेच २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकणार असं संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या विभागाने The World Population 2019 : Highlights या नावे एक अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये भारत हा २०२७ पर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असू शकतो ही बाब नोंदवली आहे.

पुढील ३० वर्षात जगाच्या लोकसंख्येत दोन अब्जांपर्यंत वाढ होऊ शकते. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ही ७.७ अब्जांवरून ९.७ अब्जांवर पोहचू शकते असाही अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. २०५० या वर्षापर्यंत लोकसंख्येत जितकी वाढ होईल त्यापैकी अर्धी वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका या देशांमध्ये होण्याचा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता २०११ च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज इतकी आहे तर चीनची लोकसंख्या १.३८ अब्ज इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला येत्या आठ वर्षात मागे टाकेल असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे.