नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्यापक चर्चा झाली असून संरक्षण, सुरक्षा, दळणवळण,व्यापार व कृषी या क्षेत्रात दोन्ही देशांच्या बाजूने सहकार्य वाढवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी चर्चेनंतर सांगितले, की नेपाळच्या सर्वागीण वाढीत भारत त्याच्या पाठीशी राहील. दोन्ही शेजारी देशात लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी सहकार्य केले जाईल.

ओली हे चीनशी मैत्री करण्यास महत्त्व देणारे नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा असून त्यांनी सांगितले, की भारत व नेपाळ यांच्यात विश्वासावर आधारित संबंध प्रस्थापित करण्यात येतील. दोन्ही देशांतील संबंध एका उंचीवर नेण्यासाठी भारतभेटीवर आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चीनसमर्थक असलेले ओली यांनी फेब्रुवारीत दुसऱ्यांदा नेपाळची धुरा घेतली असून ते यापूर्वी २०१५ ते २०१६ दरम्यान पंतप्रधान होते. त्या वेळी भारत व नेपाळ यांचे संबंध बिघडलेले होते. मोदी यांनी सांगितले, की नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे संपन्न नेपाळ व विकसित नेपाळबाबतचे धोरण हे सब का साथ सब का विकाससारखेच आहे. काठमांडूला भारताशी जोडण्यासाठी रेल्वेमार्ग सुरू करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, की नेपाळ व भारत यांच्यात संरक्षण व सुरक्षासंबंधात सहकार्य करण्यात येईल. सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही देशांत चांगले संबंध असून खुल्या सीमेचा गैरवापर होऊ नये यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील. ओली यांनी मोदी यांना नेपाळभेटीचे निमंत्रण दिले.

यापुढेही नेपाळला आमचे सहकार्य कायम राहील, दोन्ही देशांत जलमार्गाने जोडणीही करण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले.  नेपाळमधील अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करून सरकार पाडण्याचा प्रयत्न भारताने केल्याचा आरोप ओली यांनी त्यांच्या विजयानंतर केला होता. ओली यांनी सांगितले, की आर्थिक संपन्नतेसाठी आम्ही भारताशी सहकार्याची भूमिका ठेवू.