भारत आणि पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पातळीवरील चर्चेच्या वेळी भारत पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या ६० फरारी आरोपींच्या नावांची यादी सादर करणार आहे. ‘समझोता एक्स्प्रेस’ स्फोट आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ला यांच्यात तुलना करणे अयोग्य असल्याचेही भारत ठणकावून सांगणार आहे.
गुरुदासपूरमध्ये करण्यात आलेला हल्ला आणि उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर करण्यात आलेला हल्ला पाकिस्तानातून भारतात आलेल्या दहशतवाद्यांनीच केला असल्याचे पुरावे पाकिस्तानला सादर करण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांच्यात पुढील आठवडय़ात दिल्लीत चर्चा होणार आहे. त्या वेळी दाऊद इब्राहिमचे हस्तांतरण आणि मुंबईवरील हल्ल्याची सुनावणी जलदगतीने करण्याबाबतचा प्रश्न या चर्चेत उपस्थित केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांच्यासह इंडियन मुजाहिद्दीनच्या अनेक दहशतवाद्यांच्या नावांची यादी पाकिस्तानला सादर करण्यात येणार आहे. पाकिस्तानकडून समझोता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण उपस्थित केले जाण्याची शक्यता असल्याने भारताने, मुंबईवरील हल्ला आणि समझोता स्फोट यांची तुलना होऊ शकत नसल्याचा पवित्रा घेण्याचे ठरविले आहे.
मुंबईवरील हल्ला पाकिस्तानच्या अंतर्गत यंत्रणांच्या आदेशावरून करण्यात आला, समझोता स्फोट प्रकरणात भारतीय यंत्रणांचा कोणताही सहभाग नव्हता त्यामुळे या दोन घटनांची तुलना होऊ शकत नाही, असे अजित दोवल स्पष्ट करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 20, 2015 3:10 am