News Flash

पाकला योग्य वेळी प्रत्युत्तर

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या जवानांवर भ्याड हल्ला करून त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ठार केले आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानने कुरापत काढली आहे. याबद्दल भारताकडून योग्य वेळी आणि

| January 15, 2013 03:36 am

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या जवानांवर भ्याड हल्ला करून त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ठार केले आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानने कुरापत काढली आहे. याबद्दल भारताकडून योग्य वेळी आणि योग्य जागी पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशारा सोमवारी भारताचे लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी दिला.
पाकिस्तानची ही आगळीक पूर्वनियोजित असून, त्यात लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदचा सहभाग असू शकतो. शहीद हेमराजचे शिर कापून नेण्याचे कृत्य अक्षम्य असून पाकिस्तान माफीच्या लायक नाही, असे संतप्त उद्गार लष्करप्रमुखांनी काढले. शहीद हेमराजच्या कुटुंबीयांना भेटायला मंगळवारी मथुरेतील शेरगढ या गावात जाण्याची घोषणाही त्यांनी केली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ८ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैन्याने हल्ला केल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी भारताच्या वतीने पाकिस्तानला गंभीर इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी लष्कर दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून जनरल विक्रमसिंग यांनी पत्रकार परिषद घेतली. शहीद हेमराज सिंहचे कापून नेलेले शिर पाकिस्तानने परत द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सहा जानेवारीला भारतीय सैन्याच्या हल्ल्यात एक सैनिक ठार झाल्यामुळे पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल कारवाई केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ६ जानेवारी रोजी भारताने कोणतीही कारवाई केली नाही. ८ जानेवारी रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कृत्यासाठी पाकिस्तानने पूर्वनियोजित कट रचला होता. त्याचे हे कृत्य चिथावणी देणारे आहे. या कृत्याला हवे तेव्हा हवे तसे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार भारताने राखून ठेवला आहे. हल्ला झाल्यावर आम्ही गप्प बसणार नाही, असा रोखठोक इशारा लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी दिला. या पूर्वनियोजित हल्ल्याला न्यायोचित ठरविण्यासाठी पाकिस्तान खोटा प्रचार करीत आहे.  
पाकिस्तानकडून भडकविण्याचा प्रयत्न झाल्यास प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या सैनिकांनी तेवढेच तिखट आणि चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आदेश लष्करप्रमुखांनी दिले आहेत. पाकिस्तानच्या कृत्याला कशाप्रकारे उत्तर द्यायचे हा निर्णय सरकारने घ्यायला हवा, असे जनरल विक्रमसिंग म्हणाले.
पाकिस्तानी सैन्याने शिर कापून नेलेला शहीद जवान लान्स नायक हेमराज सिंह याच्या मथुरा जिल्ह्यातील शेरगढ गावात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सोमवारी भेट दिली. शहीद हेमराजचे शिर परत मिळावे म्हणून त्याची विधवा पत्नी व आई उपोषण करीत आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुढाकार घेऊन त्यांचे उपोषण सोडविले.
तात्काळ उत्तर देण्याचे भारतीय सैन्यदलाला आदेश
युद्धादरम्यानही सैन्याला शहीदांच्या सन्मानासह काही नियमांचे पालन करावे लागते. पण, नियम धाब्यावर बसवून शहीद हेमराजला जी वागणूक देण्यात आली ती सहन करणे शक्य नाही. पाक सैन्याने पुन्हा चिथावल्यास तात्काळ सडेतोड उत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. सीमेवरील जवानांनी अधिक आक्रमक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 3:36 am

Web Title: india will retaliate at chosen time and place army chief
टॅग : Army Chief
Next Stories
1 राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला
2 हेमराजचे शिर परत नाही आले तर पाकिस्तानहून १० शिरं आणा – सुषमा स्वराज
3 कोलकात्यात अंतराळ हवामान केंद्र सुरू करण्याचा निर्णय
Just Now!
X