यंदा सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन नेमके कधी होईल, याची माहिती मे महिन्याच्या मध्यात दिली जाईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान खात्याने २०१८ मधील मान्सूनबाबतची माहिती देण्यासाठी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा कालावधी समजण्यात येत असून देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या ९७ टक्के म्हणजेच सरकारी एवढा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याचे महासंचालक के जी रमेश यांनी वर्तवली आहे. यंदा देशात कमी पावसाची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मान्सूनचे केरळमध्ये आगमन कधी होईल याबाबतची माहिती मेच्या मध्यात दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी स्कायमेट या खासगी संस्थेनेही देशभरात सरासरी एवढा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली होती. जून महिन्यात सर्वाधिक १११ टक्के तर ऑगस्टमध्ये सर्वात कमी म्हणजे ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. मात्र, हवामान खात्याने अद्याप अशी आकडेवारी जाहीर केलेली नाही.