लिपूलेख पासपर्यंत बांधण्यात आलेला रस्ता भारताच्या हद्दीमध्येच आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले. नेपाळबरोबरच्या संबंधांमध्ये निर्माण झालेले गैरसमज चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे त्यांनी सांगितले. “भारत-नेपाळमध्ये फार पूर्वीपासून अत्यंत घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. जगातील कुठल्याही शक्तीमुळे भारत-नेपाळ संबंध तुटणार नाहीत ” असे राजनाथ सिंह म्हणाले. ते उत्तराखंडमधील एका व्हर्च्युअल सभेला संबोधित करत होते.
“भारताचे नेपाळबरोबर फक्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध नाहीयत तर अध्यात्मिक नाते सुद्धा आहे आणि भारत हे कधी विसरणार नाही” असे राजनाथ म्हणाले. नेपाळच्या नव्या नकाशाला मंजुरी देण्यासाठी शनिवारी नेपाळच्या संसदेमध्ये संविधानिक दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीद्वारे नेपाळने नव्या नकाशात तीन भारतीय भूप्रदेश आपल्या हद्दीत दाखवले आहेत. नेपाळने कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय भागांवर दावा केला आहे.
“भारताने बांधलेल्या रस्त्यामुळे नेपाळच्या नागरिकांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर, ते चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील. नेपाळबद्दल भारतीयांच्या मनात कुठलीही कटुतेची भावना नाही” असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 4:14 pm