07 July 2020

News Flash

पाकिस्तानचे पाणी रोखणार

प्रत्यक्ष परिणाम मात्र सहा वर्षांनी दिसण्याची चिन्हे

प्रत्यक्ष परिणाम मात्र सहा वर्षांनी दिसण्याची चिन्हे

नवी दिल्ली : प्राधान्य देशाचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानचे पाणीही तोडण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहात जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. काश्मिरात पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर ही पावले उचलली जात आहेत, अशी माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली.

उत्तर प्रदेशात बागपत येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले की या तिन्ही नद्यांवर धरण प्रकल्प बांधून हे पाणी अडवून यमुनेकडे वळविले जाईल. त्यामुळे यमुनेच्या पाण्यातही मोठय़ा  प्रमाणात वाढ होईल.

अर्थात अधिकाऱ्यांच्या मते असा प्रवाह अडवण्यासाठी किमान १०० मीटर उंचीची धरणे बांधणे आवश्यक असून त्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी लागेल. म्हणजेच पाकिस्तानची प्रत्यक्ष पाणी-कोंडी होण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.

सिंधु पाणीवाटप करारानुसार रावी, बिआस आणि सतलज या तिन्ही नद्यांच्या पाण्यांवर भारताचा पूर्ण हक्क आहे. त्याबदल्यात सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचा पाकिस्तानकडे जाणारा प्रवाह अर्निबध ठेवण्याची अट आहे. पुलवामा हल्ल्यानंतर मात्र या तीन नद्यांचे पाणी अडवून पाकिस्तानची पाणीकोंडी करण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

प्राधान्य देशाचा दर्जा काढताच भारतात आयात होणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर २०० टक्के आयातशुल्क लावले गेले आहे. त्यापाठोपाठ पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळविले जाणार आहे.

अर्थात पाकिस्तानकडील पाण्याचा ओघ रोखण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१६मध्ये उरी हल्ल्यानंतरही असेच पाऊल भारताने उचलले होते. या नद्यांच्या पाणीवाटपाबाबत उभय देशांच्या सिंधू नदी जलआयुक्तांची वर्षांतून दोनदा बैठक होते. ती बैठक भारताने तेव्हा रद्द केली होती.

भाजपकडून प्रतिवाद

काँग्रेसच्या पंतप्रधानांवरील टीकेचा प्रतिवाद करताना भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, ‘‘पंतप्रधान दरदिवशी १८-१८ तास काम करतात. अशावेळी देशाच्या सुरक्षेबाबत त्यांच्या बांधिलकीवर शंका घेतली तरी तिचा लोकांच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही.’’

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नंतर पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, ‘‘दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार आणि सेनादलांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी पंतप्रधानांवर टीका करून काँग्रेसने आपले खरे रंग दाखवले आहेत. काँग्रेसला या हल्ल्यांची पूर्वकल्पना होती काय? आम्हाला ती नव्हती.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 4:47 am

Web Title: india will stop its share of indus water to pakistan nitin gadkari
Next Stories
1 ‘राफेल’ आदेशाच्या फेरविचाराची सर्वोच्च न्यायालयाची तयारी
2 भारताविरुद्ध कारवाईसाठी पाकिस्तानी लष्कराला अधिकार
3 मांजर होणार १४ हजार कोटींची मालकीण
Just Now!
X