करोनानं जगभरात थैमान घातलं आहे. अशातच करोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वच देश शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत भारतही अनेक देशांच्या मदतीला धावून गेला आहे. अमेरिकेसह ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे भारताचीही करोना व्हायरसच्या संकटाशी झुंज सुरु आहे. भारतासमोरही या आजाराने मोठे आव्हान निर्माण केले आहे. पण या संकटकाळात भारत स्वत: बरोबर इतर देशांचीही मदत करुन माणुसकीच्या धर्माचे पालन करत आहे.

सरकारनं ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाविरुद्ध लढ्यात भारताकडे मदतीची विनंती केली होती. ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. तसंच रशियाला दोन औषधांचा पुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये २५ मार्च रोजी चर्चा झाली अशी माहिती यापूर्वी एका अधिकाऱ्याने दिली होती. आखाती देशांवर विशेषकरुन संयुक्त अरब अमिरातीवर भारताचे विशेष लक्ष आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्ष श्रिंगला हे आखाती देशांच्या संपर्कामध्ये आहेत. बहरीनला सुद्धा HCQ च्या गोळया पाठवण्यात आल्या आहेत. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरसवर सर्वाधिक प्रभावी ठरत असल्याने जगभरातून या औषधाला मोठया प्रमाणावर मागणी असल्याचं समोर आलं होतं.

काय आहे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ?

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्मितीसाठी भारत चीन आणि ब्राझील या दोन देशांकडून बहुतांश कच्चा माल आयात करतो. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे एक टॅबलेट असून एण्टी मलेरिया ड्रग क्लोरोक्वीनपेक्षा थोडं वेगळं आहे. याचा वापर ऑटोइम्यूनसारख्या आजारावर केला जातोय. सध्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषधं करोना व्हायरसवरही प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. सार्स-सीओवी-२ यावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा प्रभाव तिव्रतेनं पडत आहे. सार्स-सीओवी-२ हे करोना व्हायरस होण्याचं कारण असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेचं हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे करोनावर प्रभावी ठरत आहे.

भारताकडून निर्यातीवर बंदी

भारत सरकारने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशात या औषधांचा मुबलक साठा नाही. भारतामध्ये याची गरज जास्त आहे. त्यामुळे या औषधाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती.