भारतीय हद्दीत घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील जवानांवर हल्ला करणारे दहशतवादी होते. ते पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशात हल्ला करण्यासाठी आले होते, असे निवेदन संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅंटनी यांनी राज्यसभेत दिली. 
काश्मीर खोऱयातील पूंछ विभागात सोमवारी रात्री पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यमध्ये पाच जवान शहीद झाले. या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेमध्ये उमटले. राज्यसभेमध्ये या विषयावर सरकारने सविस्तर निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी संरक्षणमंत्री अ‍ॅंटनी यांनी या विषयावर निवेदन केले.
पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे सांगत ते म्हणाले, सोमवारी रात्री सुमारे २० दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून एकूण सहा जणांवर हल्ला केला. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा होता. हल्ला झालेल्या जवानांमध्ये एका प्रशिक्षणार्थी अधिकाऱयाचाही समावेश आहे. हल्ल्यामध्ये एकूण पाच जवान शहीद झाले असून, एक जवान जखमी झाला आहे.
पुढील काळात नियंत्रण रेषेवर कोणतीही घातपाती कारवाई होऊ नये, यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेतली जाईल, असेही अ‍ॅंटनी म्हणाले.