“करोना व्हायरसच्या संकटाला भारत संधीमध्ये बदलेल. भारत आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करेल. आज आम्ही ज्या गोष्टी आयात करतोय, उद्या त्याच सर्वाधिक निर्यात करु” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. व्यावसायिक खाणकामासाठी ४१ कोळसा खाणींच्या लिलावाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

“आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आत्मनिर्भर भारताचा अर्थ होतो. कोळसा खाणी व्यावसायिक खाणकामासाठी देऊन आम्ही कोळसा उद्योगाला दशकाच्या लॉकडाउनमधून मुक्त करत आहोत” असे मोदी म्हणाले.

“कोळसा खाणीमध्ये भारत जगातील चौथा सर्वात मोठा देश आहे. पण भारत कोळसा निर्यात करत नाही. उलट कोळसा आयातीमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर आहे. २०१४ सालानंतर ही परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली. कोळसा लिंकेजचा कोणी विचार करु शकत नव्हते, ती गोष्ट आम्ही करुन दाखवली” असे मोदी म्हणाले.