चीनच्या दबावामुळे भारत झुकला

चीनचे बंडखोर नेते व उघुर कार्यकत्रे डोलकुन इसा यांना व्हिसा देण्याच्या निर्णयावर भारताने चीनच्या दबावामुळे माघार घेतली आहे.

धर्मशाला येथे दलाई लामा यांच्या उपस्थितीत लोकशाही परिषद होणार आहे. त्यासाठी इसा हे या आठवडय़ात उपस्थित राहणार होते.

इसा हे जर्मनीत विजनवासात राहतात. भारताने व्हिसा रद्द केल्याने आपण निराश झालो आहोत. भारताची अडचण मी समजू शकतो, पण माझ्या संभाव्य दौऱ्याने एवढा वाद होईल असे वाटले नव्हते, असे इसा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

बंडखोर नेते इसा यांच्यावर इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस असल्याने त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. रेड कॉर्नर नोटीस जारी केली असली तरी अमेरिका, जपान यांसारख्या देशात मी जाऊन आलो आहे, असे इसा यांनी सांगितले. भारतात आल्यास अटक करून चीनच्या ताब्यात देऊ नये, असे त्यांनी म्हटले होते.

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझरवर संयुक्त राष्ट्रात र्निबध लादण्याच्या भारताच्या ठरावावर चीनने नकाराधिकार वापरला होता. त्यानंतर डोलकुन इसा यांना व्हिसा मंजूर करून भारताने चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र मंजूर करण्यात आलेला व्हिसा रद्द करण्यात आल्याने विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आठवडाभरापूर्वी चीनविरोधी प्रथमच ताठर भूमिका घेतल्याचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारने आता नरमाईची भूमिका घेत चीनच्या सांगण्यावरून व्हिसा नाकारला, अशी टीका जम्मू-काश्मीरचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.