विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात पंचांच्या सदोष कामगिरीमुळे बांगला देशचा पराभव झाला असा आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी केलेला असतानाच आता त्यावर बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी शिक्कमोर्तब केले आहे. शेख हसिना यांनीही बांगला देशच्या पराभवाला पंचांची कामगिरी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यांत पंचांकडून चुका झाल्या नसत्या तर भारत बांगला देशला पराभूत करू शकला नसता, असे हसिना यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी कमाल यांनी पंचगिरीच्या मुद्दय़ावरून पदत्याग करण्याचा इशारा दिला आणि सदर सामना ‘निश्चित’ असल्याचे सूचित केले.आयसीसीच्या पुढील बैठकीत आपण पंचगिरीबाबतचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे मुस्तफा कमाल यांनी मेलबोर्न येथे वार्ताहरांना सांगितले.