वॉशिंग्टन : भारत, इराण, रशिया आणि तुर्की यासारख्या देशांना कधी ना कधी अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांविरुद्ध लढा द्यावा लागेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. जवळपास सात हजार मैल इतकी दूर असलेली अमेरिका दहशतवाद्यांविरुद्ध लढत आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध लढा देण्याच्या प्रश्नावर अन्य देशांकडून सध्या अत्यल्प प्रयत्न केले जात आहेत, असेही ट्रम्प म्हणाले. यापुढे कधी ना कधी रशिया, अफगाणिस्तान, इराण, इराक, तुर्की यांना आपली लढाई लढावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

या सर्व देशांना दहशतवाद्यांशी लढावेच लागेल. कारण आम्ही आणखी १९ वर्षे तेथे राहावे का, आपल्याला तसे वाटत नाही आणि त्यामुळेच भारत, रशिया, तुर्की, इराण, इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना कधी ना कधी लढावेच लागेल, असे ट्रम्प म्हणाले.

युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे मागे घेतले जाणार नाही, असे ट्रम्प यांनी सूचित केले, तालिबान्यांचे तेथे नियंत्रण राहणार नाही यासाठी अमेरिकेसमवेत कोणी तरी तेथे असेल असेही ट्रम्प म्हणाले होते, त्यानंतर ट्रम्प यांनी वरील मत व्यक्त केले आहे.