News Flash

‘त्या’ बाद नोटांची दक्षिण आफ्रिकेत चलती!

दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक प्रचाराचे साहित्य म्हणून निर्यात केले जाणार आहेत

(संग्रहित छायाचित्र)

पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांच्या लगद्याचे प्रचारफलकांमध्ये रूपांतर आणि निर्यात

निवडणूक म्हटली की पैशाचा खेळ आलाच. पाचशे आणि हजारच्या नोटांवर आठ नोव्हेंबर २०१६ला बंदी आली आणि निवडणुकीतला पैशाचा खेळ आटणार, अशी ग्वाही देत ‘काळ्या पैशा’विरोधातले बिगुल भारतात वाजले खरे, पण याच नोटांचा खेळ आता वेगळ्या रूपात रंगणार आहे तो थेट दक्षिण आफ्रिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत. विशेष म्हणजे भारतातल्याप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतही २०१९ मध्येच सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

बरोबर वर्षभरापूर्वी, म्हणजे आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपये चलनमूल्याच्या नोटा बाद ठरवल्या. त्यानंतर या बाद नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि आपल्या खात्यातून हक्काचे पैसे मिळवण्यासाठी देशभर रांगा लागल्या. त्या नोटा पंतप्रधानांच्याच सांगण्याप्रमाणे, ‘केवळ कागदाचा तुकडा’च उरल्या होत्या. कुणी तर वाहत्या गंगेतही हा पैसा बुडवला, तर जवळ असूनही आपला पैसा पाण्यातच गेल्याचं ‘काळं’ दु:ख अनेकांना पचवावं लागलं. तरी रिझव्‍‌र्ह बँकेत अधिकृतपणे जमा झालेला हा पैसा आता शब्दश: पाण्यातच गेला आहे! या नोटांचा लगदा  लाकडाच्या लगद्याशी एकजीव करून त्यापासून लाकडी फलक बनवले जाणार आहेत. हे फलक दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक प्रचाराचे साहित्य म्हणून निर्यात केले जाणार आहेत. केरळातील वेस्टर्न इंडिया प्लायवूड्स ही कंपनी आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यातील करारानुसार चलनाचे हे रूपांतर झाले आहे.

कंपनीचे सरव्यवस्थापक टी. एम. बावा यांनी ‘एक्स्प्रेस वृत्तसमूहा’च्या प्रतिनिधीला सांगितले की, ‘‘निश्चलनीकरणानंतर तिरुवनंतपूरम येथील रिझव्‍‌र्ह बँकेच्या विभागीय कार्यालयाने आमच्याशी संपर्क साधला. आपल्याकडील नोटांचे काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला होता. आम्ही त्यातील काही नोटा ताब्यात घेतल्या. आमच्या संशोधन आणि विकास विभागाने त्यांची पाहणी करून सखोल चर्चा केली. मग या नोटांचा लगदा करून तो लाकडाच्या लगद्यात मिसळून त्याचे लाकडी फलकात रूपांतर करता येईल, असे स्पष्ट झाले. मग प्रत्यक्ष चाचणीत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर हे काम हाती घेण्यात आले.’’

दक्षिण आफ्रिकेत या फलकांना घाऊक मागणी आहे. त्यापाठोपाठ अन्य काही आफ्रिकी देशांत तसेच मध्य पूर्वेतही त्यांना मागणी आहे, असेही बावा यांनी सांगितले. चलनी नोटांपासून बनवलेले हे फलक अधिक कडक आहेत आणि त्यांचे रूपही अधिक आकर्षक आहे. किरकोळ विक्रेते याची चढय़ा दराने विक्री करीत आहेत आणि चलनी नोटांपासून हे फलक तयार केल्याचे समजताच त्यांना मागणीही वाढत आहे. आम्ही मात्र आमचे विक्रीमूल्य वाढविलेले नाही, असेही बावा यांनी स्पष्ट केले.

रुपयाचा असाही प्रवास

* चलनी नोटांचे लगद्यात आणि नंतर लाकडी फलकात रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान केवळ आपल्याकडे असल्याचा ‘वेस्टर्न इंडिया प्लायवूड्स’चा दावा.

* आतापर्यंत ५० ट्रेलरद्वारे ७५० टन नोटा कंपनीकडे. प्रतिटन कंपनीला १२८ रुपये खर्च.

* तिरुवनंतपूरम येथील रिझव्‍‌र्ह बँकेच्या विभागीय कार्यालयातून या नोटा ताब्यात घेणे, त्यांची बांधाबांध आणि वाहतूक तसेच अन्य खर्चाची जबाबदारी कंपनीचीच.

* अन्य राज्यांकडूनही जुन्या नोटा घेण्याविषयी विचारणा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 4:13 am

Web Title: indian 500 and 1000 ban note demand in south africa
Next Stories
1 दिल्लीमधील वायूप्रदूषण धोक्याच्या पातळीवर, शाळांना सुट्टी
2 पॅराडाइज पेपर्समध्ये जॉर्डनची राणी, कोलंबियाच्या अध्यक्षांचेही नाव
3 पॅराडाइज घोटाळ्यात खेमका यांचा सन समूह आघाडीवर
Just Now!
X