करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सध्या चिंताजनक परिस्थिती असून अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यांकडून केंद्राकडे ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वारंवार मागणी केली जात आहे. संकटाच्या या काळात भारतीय हवाई दलाने केंद्राच्या मदतीला धाव घेतली आहे. भारतीय हवाई दलाकडून ऑक्सिजन कंटेनर्स, सिलेंडर्स, महत्वाची औषधं, साहित्य आणि करोनाशी लढण्यासाठी सरकारला मदत करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट केलं जात आहे.

हवाई दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं (डीआरडीओ) रुग्णालय उभं करण्यासाठी आम्ही कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि बंगळुरुतून डॉक्टर आणि परिचारिकांना एफरलिफ्ट केलं. तसंच दिल्लीमधील करोना केंद्रांसाठी बंगळुरु येथून डीआरडीओचे ऑक्स्जिन कंटेनर्स एअरलिफ्ट करण्यात आले.

भारतीय हवाई दलाने ट्विट करत म्हटलं आहे की, “करोनाविरोधातील लढाईत वेगाने वाहतूक करत भारतीय हवाई दल मदत करत करत आहे. वैद्यकीय कर्मचारी, महत्वाची सामुग्री आणि औषधं देशभरातील करोना रुग्णालयं आणि सुविधांमध्ये पोहोचवण्याचं काम सुरु आहे”.

दरम्यान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशभरात राज्य सरकारांना मदतीसाठी रोड मॅप आखण्यास सांगितलं. संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावतदेखली यावेळी उपस्थित होते.