करोना व्हायरसमुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची हवाई दलाकडून सुटका करण्यात आली आहे. ५८ भारतीयांना घेऊन हवाई दलाचं सी १७ ग्लोबमास्टर विमान गाजियाबादमधील हवाई तळावर दाखल झालं आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली आहे. करोना व्हाससरचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेल्या देशांमध्ये इराणचा समावेश आहे.

“५८ भारतीयांची पहिली बॅच इराणहून भारतात आणण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाचं सी-१७ विमानाने तेहरान येथून टेक ऑफ केलं असून लवकरच गाजियाबादमध्ये दाखल होईल,” अशी माहिती त्यांनी दिली होती. एस जयशंकर यांनी भारतीय हवाई दलाचं तसंच तेहरानमधील भारतीय दुतवासाचं आणि भारतीयांची सुटका करण्यात मदत करणाऱ्या इराणमधील प्रशासनाचं कौतुक केलं आहे.

एस जयशंकर यांनी म्हटलं आहे की, “इराणमधील भारतीय दुतावास तसंच आव्हानात्मक परिस्थितीत काम कऱणाऱ्या मेडिकल टीमच्या प्रयत्नांचं कौतुक आहे. इराणमधील प्रशासनाने केलेल्या सहकार्याचंही कौतुक आहे”. हवाई दलाच्या सी १७ ग्लोबमास्टर विमानाने इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सोमवारी उड्डाण केलं होतं.

आणखी वाचा- पुण्यात आढळले करोनाचे दोन रूग्ण; उपचार सुरू

इराणमध्ये करोना व्हायसरने थैमान घातला असून ७१६१ रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत २३७ जणांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर सर्वात जास्त मृत्यू इराणमध्ये झाले आहेत. याआधी भारतीय हवाई दलाने चीनमधील वुहान शहरात आपलं विमान पाठवलं होतं. यावेळी सोबत वैद्यकीय सामग्री पाठवण्यात आली होती. विमानाच्या सहाय्याने चीनमध्ये अडकलेल्या ७६ भारतीय आणि ३६ परदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली.