आज ८ ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे. आजच्या ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त जाणून घेऊयात भारतीय हवाई दलाबद्दलच्या काही खास गोष्टी

>
‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे. या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे वाक्य सुचविले.

>
नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥

या भगवद्गीतेच्या ११ व्या अध्यायातील श्लोकामधील हे वाक्य आहे. याचा अर्थ होतो, हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.

>
सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.

>
१२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअरफोर्स असे झाले. १९५० मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नावातील रॉयल हा शब्द वगळण्यात आला.

>
भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहे.

>
भारतीय हवाई दलाची एकूण ६० एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण १ हजार ७०० हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे आहे. यामध्ये ५०० हून अधिक मालवाहू विमानांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलाकडे अनेक हॅलिकॉप्टर्सही आहे.

>
एकूण सात कमांड्सकडे या सर्व एअरबेसची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये वेस्टर्न एअर कमांडअंतर्गत सर्वाधिक म्हणजे १६ एअरबेस आहेत तर सर्वात कमी म्हणजे सात एअरबेसचे नियंत्रण सेंट्रल एअर कमांडकडे आहे.

>
तझाकिस्तानमधील फर्कहोर येथेही भारतीय हवाई दलाचा एअरबेस आहे. हा कोणत्याही भारतीय सुरक्षा दलाचा देशाबाहेरील पहिला आणि एकमेव तळ आहे.

>
१९३३ पासून आत्तापर्यंत भारतीय हवाई दलाच्या ध्वजावरील आणि विमानांवर छापण्यात येणाऱ्या हवाई दलाचे बोधचिन्ह चार वेळा बदलण्यात आले आहे.

>
भारतीय हवाई दलातील अधिकारी निर्मल जीत सिंग सिख्खोन हे परविरचक्र हा सुरक्षादलातील कामगिरीसाठी देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळवणारे हवाई दलातील पहिले अधिकारी ठरले. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

>
पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धामधील कामगिरीसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

>
२००४ साली द गरुड कमांडो फोर्स या विशेष तुकडीची भारतीय हवाई दलाच्या अंर्तगत स्थापना करण्यात आली. आज या दलामध्ये दोन हजारहून अधिक कमांडो आहेत. हे दल बचावकार्य, आप्तव्यस्थापनाअंतर्गत केले जाणारे मदतकार्य करण्याचे काम करते.

>
दिल्लीमध्ये भारतीय हवाई दलाचे एक संग्रहालय आहे. स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या हवाई दलाबद्दलच्या अनेक आठवणी या संग्रहालयाच्या माध्यमातून जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत.

>
सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणक प्रणाली भारतीय हवाई दलाकडे आहे.

>
हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी यंत्रणा असणारी विमाने अशी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय हवाई दलाकडे आहेत.

>
नुकतीच भारतीय हवाई दलात राफेल या लढाऊ विमानांची पहिली तुकडीही सामील करण्यात आली आहे.