लष्करातील अधिकारी असो किंवा जवान सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही ते नेहमीच देशावर तितकंच प्रेम करतात. देशाप्रती असणारं आपलं कर्तव्य त्याच जिद्धीने ते पार पाडतात. ७४ वर्षीय सीबीआर प्रसाद यांनी हे सिद्ध केलं आहे. भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेल्या प्रसाद यांनी आपली आयुष्यभराची कमाई संरक्षण मंत्रालयाला दान केली आहे. दान करण्यात आलेली रक्कम एक कोटीहून जास्त आहे.

प्रसाद यांनी सांगितलं आहे की, “जवळपास नऊ वर्ष मी भारतीय हवाई दलात काम केलं आहे. यानंतर मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला. आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाल्यानंतर आता संरक्षण मंत्रालयासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी १.८ कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला”. प्रसाद यांनी सोमवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत त्यांच्याकडे चेक सोपवला.

यासाठी कुटुंबीयांनी परवानगी दिली का ? असं विचारलं असता प्रसाद यांनी सांगितलं की, “नक्कीच…कोणालच काहीही समस्या नव्हती. मी संपत्तीमधील दोन टक्के पत्नी आणि एक टक्का मुलीच्या नावे केला आहे. उरलेली ९७ टक्के रक्कम दान केली आहे. मी हे पैसे समाजाला परत करत आहे”.

प्रसाद यांनी एकेकाळी आपल्या खिशात फक्त पाच रुपये होते, पण कशाप्रकारे मेहनत करुन ५०० एकर जमीन विकत घेतली याबद्दलही सांगितलं. यामधील पाच एकर त्यांनी पत्नी तर १० एकर मुलीला दिली आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकावं अशी माझी इच्छा होती. पण ते होऊ शकलं नाही अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. मात्र आपलं हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांनी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी सुरु केली आहे.