भारतीय हवाई दलासाठी २०१९ हे वर्ष घातक ठरत आहे. मागील सहा महिन्यांमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांचे नऊ वेळा अपघात झाले आहेत. नुकताच आसाममधील जोरहाट येथे आयएएफच्या एएन ३२ विमानाला अपघात झाला. या विमानातील सर्वच्या सर्व १३ जवान शहीद झाले आहेत. ३ जूनपासून बेपत्ता असलेल्या या विमानाच्या अवशेष अरुणाचल प्रदेशमधील दूर्गम भागामध्ये अढळून आले आहेत.

हा अपघात होण्याआधी ३१ मार्च रोजी मीग-२७ विमान राजस्थानमधील जोधपूर येथे कोसळले. या विमानातील वैमानिक सुरक्षितरित्या बाहेर पडला. हवाई दलाच्या उत्तराली एअरबेसवरुन उड्डाण केलेल्या या मीग-२७ विमानाच्या इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे उड्डाण केल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे या विमानाचा अपघात झाला. मार्च महिन्यात मीग-२१ विमानाचा अपघात होण्याची ही दुसरी वेळ होती. त्याआधी ८ मार्च रोजी राजस्थानमधील नाल येथे मीग-२१ विमानाचा अपघात झाला होता. या अपघातामध्येही प्रसंगावधान दाखवल्याने वैमानिक वेळीच विमानाच्या बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला.

भारतीय हवाई दलासाठी या वर्षातील फेब्रुवारी महिना सर्वात अधिक अपघातांचा आणि जीवघेणा ठरला. केवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांचे पाच अपघात झाले. या अपघातांमध्ये सहा विमाने अपघातग्रस्त झाली. महिन्याच्या पहिल्याच तारखेला बंगळूरूजवळ मिराज २००० विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. हिंदुस्तान अॅरोनॉटिकल्स लिमिटेडने हे विमान अद्यावत सुविधांनी अपडेट करुन हवाई दलाकडे सूपूर्द केले होते. उड्डाण केल्यानंतर काही क्षणांमध्ये या विमानाचा अपघात झाला. या अपघातात स्क्वाड्रन लीडर सिद्धार्थ नेगी आणि स्क्वाड्रन लीडर समीर अबरोल या दोघांचा दूर्देवी मृत्यू झाला.

त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी मीग-२७ हे लडाऊ विमान पोखरण परिसरामध्ये सरावादरम्यान अपघात झाल्याने राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळले. या अपघातामधून वैमानिक थोडक्यात बचावला. यानंतर १९ फेब्रुवारी रोजी बंगळुरुमधील एरो इंडियन शोआधी सुरु असणाऱ्या सरावादरम्यान दोन सूर्य किरण हॉक जेट विमाने हवेतच एकमेकांना आदळली. येल्लंका हवाईतळावरुन उड्डाण केलेली ही विमानांची हवेतच धडक झाली. या अपघातामध्ये एका वैमानिकाचा मृत्यू झाला तर दोन वैमानिक बचावले.

या अपघातानंतर आठच दिवसांनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांचा अपघात झाला. २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीमध्ये येण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडताना दोन्ही कडून झालेल्या हल्ला प्रतिहल्ल्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील बुडगाम येथे भारतीय हवाई दलाच्या एमआय-१७ या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातामध्ये भारतीय हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांबरोबर एका नागरिकाचा मृत्यू झाला. चौकशीनंतर सरावादरम्यान केलेल्या गोळीबारीमुळे हा अपघात झाल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

याच दिवशी भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान चालवत असलेले मीग-२१ बायसन हे विमान पाकिस्तानच्या हवाईदलाने पाडले. या हल्ल्यामध्ये विमान नष्ट झाले मात्र अभिनंदन वेळीच विमानातून बाहेर पडल्याने बचावले. विमानातून इजेक्ट झालेले अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याने त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आणि नंतर काही दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली.

या वर्षात भारतीय हवाई दलाचा सर्वात पहिला अपघात जानेवारी महिन्यात झाला होता. उत्तर प्रदेशमधील खुशीनगर जिल्ह्यामध्ये हवाई दलाचे जॅग्वार विमान अपघातग्रस्त झाले. या अपघातात वैमानिक बचावला.