अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्त भागात बचाव कार्यासाठी गेलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर मंगळवारी दुपारी बेपत्ता झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. दुपारनंतर या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला असून परिसरात शोधमोहीमही राबवली जात आहे.

मंगळवारी दुपारी अरुणाचल प्रदेशमधील पापूम परे या पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर झेपावले होते. अरुणाचल प्रदेशला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरु असून यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे. संगली गावात अडकलेल्या ग्रामस्थांच्या सुटकेसाठी एक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. या हेलिकॉप्टरने मंगळवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत किमान ५० जणांची सुटका केली होती. मात्र दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. इटानगर येथे परतत असताना हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला असून हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरु असल्याचे हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरने सकाळपासून पाच वेळा संगली ते इटानगर अशी फेऱ्या मारल्या होत्या. हेलिकॉप्टर ज्यावेळी बेपत्ता झाले ती सहावी फेरी होती असे स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. काही तांत्रिक अडचणींमुळे नऊ नागरिकांची सुटका करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे हे हेलिकॉप्टर स्थानिकांना न घेताच इटानगरच्या दिशेने रवाना झाले. हेलिकॉप्टरमध्ये दोन क्रू मेम्बर आणि बचाव मोहीमेसाठी तैनात केलेला पोलीस दलातील एक जवान असे तिघे जण होते. या तिघांची नावे अद्याप समजू शकलेली नाही.